Baba amte biography in marathi raval
बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे | |
---|---|
जन्म | डिसेंबर २६, इ.स. १९१४ हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | फेब्रुवारी ९, इ.स. २००८ |
निवासस्थान | आनंदवन, चंद्रपूर जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | बाबा आमटे |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बी.ए.एल.एल.बी. |
प्रसिद्ध कामे | आनंदवन लोकबिरादरी प्रकल्प |
ख्याती | कुष्ठरुग्णांची सेवा |
धर्म | हिंदू |
जोडीदार | साधना आमटे |
अपत्ये | प्रकाश आमटे, विकास आमटे |
वडील | देवीदास |
पुरस्कार | डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ आनंदवन |
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते .याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
जीवन
[संपादन]मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातीलवर्धा जिल्ह्यातल्याहिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना [ संदर्भ हवा ] गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
अभय साधक
[संपादन]१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.[१]
आनंदवन
[संपादन]बाबा आमटे आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई तसेच आजही काही लोक ते अंधश्रद्धेमुळे तसे मानतात. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी (तुळशीराम) पाहिला[२]. ते त्याला घरी घेऊन आले. गांधींनी ज्याला गौरविले होते अश्या अभयसाधकाला त्या कुष्ठारोग्याला पाहून भीती वाटली. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.[३]. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवाऱ्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.
भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण [ संदर्भ हवा ] ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.
बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.
एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती.साचा:Fact गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.साचा:Fact
संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित रहात असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.
फेब्रुवारी ९, इ.स. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत.
कार्य
[संपादन]इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.
बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत.
साहित्य
[संपादन]- बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत
- 'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
- 'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
- 'माती जागवील त्याला मत'
- बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
- आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे [५]
- मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक: विलास मनोहर)
- बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
- बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)
- बाबा आमटे यांची गीते: आकलन आणि आस्वाद (बाळू दुगडूमवार). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे (२०१७)
- बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी 'वादळ माणसाळतंय' नावाचे नाटक लिहिले आहे.
- बाबा आमटे - व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्त्व (लेखक: बाळू दुगडूमवार)
पुरस्कार
[संपादन]आंतरराष्ट्रीय
[संपादन]- सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - इ.स. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्.
- संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, इ.स. १९९८
- आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका इ.स. १९८९
- टेंपल्टन बहुमान, अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी), इ.स. १९९०
- पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर, इ.स. १९९१
- पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार, इ.स. १९९१
- पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)
- राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन - इ.स. १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठीमेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे )
- गूगल ने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे (त्यांच्या जयंतीच्या दिवशी) यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.[६]
भारतीय
[संपादन]- पद्मश्री इ.स. १९७१
- पद्मविभूषण इ.स. १९८६
- अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६
- महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुलॆ पुरस्कार इ.स. १९९८
- गांधी शांतता पुरस्कार इ.स. १९९९
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे, इ.स. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
- मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार इ.स. १९८५
- पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार इ.स. १९८६
- महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इ.स. १९७४
- राष्ट्रीय भूषण पुरस्कार इ.स. १९७८
- जमनालाल बजाज पुरस्कार इ.स. १९७९
- एन डी दिवाण पुरस्कार इ.स. १९८०
- राजा राम मोहनराय पुरस्कार इ.स. १९८७
- भरतवास पुरस्कार इ.स. २००८
- जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९८८
- महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स. १९९१
- कुमार गंधर्व पुरस्कार इ.स. १९९८
- जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक इ.स. १९९८
- डी.लिट - नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०
- डी. लिट. - पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६
- देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल
संदर्भ
[संपादन]- Wisdom song: The life of Baba Amte - Neesha Mirchandani - Originally published by Roli Books Pvt. Ltd. Delhi © Neesha Mirchandani, अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र - निशा मिरचंदानी - मराठी अनुवाद - लीना सोहोनी - मेहता पब्लिशिंग हाउस - पुणे - फेब्रुवारी २००८